इर्शाद!
मी मोर्चा नेला नाही,
मी संप ही केला नाही,
मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही!
या अशाच हलक्याफुलक्या शब्दात आपण मध्यमवर्गीय पांढरपेशे
गेली कित्येक वर्षे आपल्याच आयुष्यावर बोलत आहोत. हा वर्ग आयुष्याच्या चक्राशी
बांधलेला असतो. सामाजिक प्रश्नांबद्दल पेपर वाचून हळहळ व्यक्त करतो. राजकारणावर
चर्चा करतो पण चर्चेपलिकडे तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. दुष्काळाच्या/भूकंपाच्या
मदतनिधीत आपला खारीचा वाटा देतो. आणि मोकळ्या वेळात अशा काव्य/नाट्य व अन्य
सांस्कृतिक कार्यक्रमांत रमून जातो.
हे सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन करणे, आपल्या
माणसांसोबत वेळ घालवणे, मजा करणे याच हेतूने असतात. अशा
ठिकाणी माणसांनी एकमेकांवर आपटून सुख-दुःख शेअर करण्यातली मजा काही औरच असते.
कधीकधी या कार्यक्रमांना किंचित धार्मिक
छटा असते. कधी गणपतीसाठी मंडपा-मंडपातून फिरणे, कधी x'masला एकमेकांचा secret santa बनणे, कधी होळीला भेटून रंग लावणे तर
कधी रमझानच्या महिन्यात मोहम्मद अली रोडला जाऊन एकदा तरी ताव मारणे! पण
मध्यमवर्गीय पांढरपेशा कधीही धर्माला या सर्वसामायिक संस्कृतीपुढे शिरजोर होऊ देत
नाही.
या वर्गाला धर्म संकटात आल्याची चिंता नसते. कारण त्याला
नीटच ठाऊक असते की ही केवळ काही धर्मांधांची विनाकारण दवंडी आहे, ज्याचा खऱ्या
आयुष्यशी कुठेही संबंध नाही. "ऑफिसला वेळेवर पोचणार की नाही?", "पगारवाढ होणार की नाही?",
"मुला-बाळांच्या
शिक्षणाचा खर्च कसा निभावणार?" या अशा यांच्या चिंता असतात.
आणि म्हणूनच हे लोक धर्मांध बडबडीकडे "जाऊ दे ना" म्हणत दुर्लक्ष करतात.
पण यामुळे ही धर्मांध मंडळी "मौनम् संमती लक्षणं"
या तत्वानुसार मध्यमवर्गाला गृहीत धरू लागतात. ह्याच संस्कृतीला हळूहळू धार्मिक
रंग चढवू लागतात. तरीही पांढरपेशा गप्प राहतो. कारण त्याला वाटत असतं की या आगीची
धग त्यांच्यापर्यंत कधीच पोचणार नाही.
आणि मग एक दिवस ती आग वणवा बनून पसरू लागते. सणाला जश्न
म्हटलं म्हणून गरळ ओकली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाच नाव इर्शाद ठेवलं म्हणून
थयथयाट होऊ लागतो.
जेव्हा वातावरण एवढं गढूळ होत आहे, तेव्हा
मध्यमवर्गाने आता पुन्हा स्वतः ला विचारायला हवं की अजूनही कानाडोळाच करत राहायचा
की "हे आम्हाला मंजूर नाही" हे
परखडपणे बोलायचं. ही सर्वसामायिक संस्कृती अस्ताला जाणे बघत बसायचं की वेळ पडलीच
तर एखाद्या "इर्शाद" च्या सभागृहाबाहेर या संस्कृतीवरचा हल्ला थोपवायला
उभं राहायची हिम्मत दाखवायची.
नाहीतर.... भविष्यात आरशापुढे उभं राहून हेच म्हणायचं...
भवताली संगर चाले, तो विस्फारून बघताना,
कोणी पोटातून चिडताना, कोणी रक्तातून लढताना,
मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा,
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही.....!
- अभिसुळे
